Monday, 2 April 2012

मला भावलेले गीत रामायण

‘ गीत रामायण ‘ मराठी संगीताला पड़लेले एक मधुर स्वप्न आहे. ‘महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकि’ असे गौरविलेले ग. दि. माडगुलकर (गदिमा)  आणि ‘बाबूजी’ या लाड़क्या नावाने परिचित असलेल्या सुधीर फडके यांनी रचलेला हा एक चमत्कार आहे. गदिमांचे अद्भुत शब्द, बाबूजींच्या श्रवणीय चाली आणि त्यांचाच सुरेल आवाज यांचा जमून आलेला सुन्दर मिलाफ म्हणजे ‘गीत रामायण’ ! आज इतक्या वर्षांनंतर देखील त्याची गोडी कमी झाली नाही यातच या दोघांच्या अपूर्व प्रतिभेचा प्रत्यय येतो.
गीत रामायणाची संकल्पना आकाशवाणी चे श्री सीताकांत लाड़ यांचा मनात सर्वप्रथम आली आणि ती म्हणजे आकाशवाणीवर दर रविवारी रामायणातील एक प्रसंग गीत रूपाने सादर करण्याची . कल्पना विलक्षण होती , पण ती साकार करण्या साठी तेवढ्याच ताकदीचे कलाकार हवे होते. त्यांनी गदिमा आणि सुधीर फडके यांचाशी भेट घेवून आपले मनोगत सांगितले. दोघे ही भारावून गेले . पण हे काही सोपे काम नव्हते. आठ दिवसात गीत लिहिणे, त्याला चाल लावणे, रिहर्सल करून लाईव्ह सादर करणे ... ते ही पूर्ण वर्ष, न चुकता ! पण बाबूजी आणि गदिमा ही काही सामान्य माणसे नव्हती , ते तर दैवी प्रतिभेचा वरदान लाभलेले सरस्वती पुत्र होते. त्यांनी हे आह्वान स्वीकारले आणि १ अप्रैल १९५५ च्या मंगल दिनी राम नवमीचा मुहूर्त साधून पहिले गाणे रेडियो वर प्रसारित झाले . ते होते ‘स्वये श्री राम प्रभु ऐकती , कुश लव रामायण गाती’ . अवघ्या महाराष्ट्राला या गाण्याने वेड लावले.त्या नंतरचे सम्पूर्ण वर्ष तर महाराष्ट्र जणू राममय झाला. या अभूतपूर्व कलाकृतीचे नऊ भारतीय भाषांमध्ये रूपांतर झाले आहे : असमिया , बंगाली,इंग्लिश ,हिंदी,कन्नडा,कोंकणी ,सिंधी, तेलुगु आणि ओरिया.
गीत रामायणाचा आणि माझा प्रथम परिचय १९८१ साली झाला. त्या वेळी घरात टेप रेकॉर्डर किंवा रेकॉर्ड प्लेयर असणे मोठी अपूर्वाई होती. सर्व सामान्यांची संगीताची क्षुधा शमविण्याचे कार्य रेडियो करीत असे. मी दहा वर्षाचा असताना आमच्या घरी पहिला छोटा सा टेप रेकॉर्डर आला. टेप रेकॉर्डर बरोबर माझ्या वडीलांनी काही कॅसेट्स पण आणल्या होत्या . त्यात काही मराठी तर काही हिंदी कॅसेट्स होत्या. गीत रामायणाच्या आठ कॅसेट्स चा संच देखील त्यामध्ये होता. आमच्या टेप रेकार्डर चे उद्घाटन गीत रामायण लावूनच झाले. प्रथम भेटीतच या स्वर्गीय रचनेच्या प्रेमात पडलो. त्या नंतर आज पर्यंत अक्षरशः हजारो वेळा ऐकले पण त्याची गोडी तसूभरही कमी झालेली नाही.

गदिमा यांनी गीत रामायणात आपली समस्त प्रतिभा पणाला लावली आहे. रामायणातील ठळक घटना आणि व्यक्तिरेखा यातील गाण्यांमध्ये येतात. श्रीराम, दशरथ,कौसल्या,लक्ष्मण,भरत,सीता,शूर्पणखा यांना एकापेक्षा जास्त तर सुग्रीव,हनुमान,जाम्बुवंत,कुम्भकर्ण,शबरी,अहिल्या इत्यादींचे एक एक गाणे आहे. काही गीते समूहस्वरात तर काही निवेदकाच्या तोंडी आहेत. सुधीर फडके यांनी त्या त्या  गाण्याच्या भाव ओळखून अनुरूप रागातील स्वरसाज चढवला आहे.
खरे तर या कलाकृतितील शब्दन् शब्द  श्रेष्ट आहे पण ज्या प्रमाणे एखाद्या सुंदर उद्यानामध्ये पण काही स्थळे विशेष सुंदर असतात. अशाच काही सौंदर्यस्थळांचा , म्हणजे मला भावलेल्या काही ओळींचा सर्वाना परिचय व्हावा म्हणून हा लेखनप्रपंच !
गीत रामायणाची सुरुवात अयोध्येतील अश्वमेध यज्ञाचा प्रसंगानी होते.  श्रीरामचन्द्रांच्या अश्वमेध यज्ञा साठी अयोध्येत अपार जनसमुदाय जमला आहे.त्यातच दोन अत्यंत सुन्दर आणि सुकुमार असे बटू आले आहेत. आणि हे बटू  राम चरित्राचे गायन राज्यसभे मध्ये करत आहेत. ‘स्वये श्री राम प्रभू  ऐकती, कुश लव रामायण गाती’ !!! हे दोन्ही बटू म्हणजे श्रीरामांचीच बाळे लव आणि कुश ! श्रीराम म्हणजे साक्षात् तेज आणि ही दोन बालके म्हणजे त्या तेजाचेच अंश. पुत्राने आपल्या पित्याचे चरित्र गायन करणे म्हणजे जणू ‘ज्योतीने तेजाची आरती’ ! किती सुंदर उपमा आहे .
लव आणि कुश  ,रामचरित्राचा प्रारंभ अयोध्या नगरीच्या वर्णनाने करतात ‘शरयू तीरा वरी अयोध्या मनु निर्मित नगरी’. अयोध्या नगरी ही अत्यंत वैभवशाली , समृद्ध आहे . तिचा राजा दशरथ अत्यंत राजकारण कुशल, धर्मपरायण, आणि प्रजावत्सल आहे. दशरथ राजा आपल्या प्रजेला अपत्याप्रमाणे प्रेम करतात पण ते स्वतः अपत्यहीन असावेत हे किती दुर्दैव. लोकांच्या आशा ‍‌‌आकांक्षा कल्पतरु प्रमाणे पूर्ण करण्यात समर्थ असलेल्या दशरथ राजांचे स्वतःचे मनोरथ पूर्ण न व्हावे ? अयोध्येच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात हा सल आहे. माडगुळकर या सुन्दर पंक्ति द्वारे तो व्यक्त करतात ‘कल्पतरुला फूल नसे कां वसंत सरला तरी, अयोध्या मनु निर्मित नगरी’ .
दशरथ राजाच नव्हे तर महाराणी कौसल्याची दशा काही वेगळी नाही. वंश वेलीला फूल नसल्या मुळे  उदास असलेल्या कौसल्येची मनःस्थिती फारच विचित्र झाली आहे. वेली वर फुललेली फुले पाहून देखील तिचे मन उदास होते’.ती म्हणते ‘पुन्हां का काळिज माझे उले , पाहुनी वेली वरची फुले ‘. हरिणी-पाडस, गाय-वासरू ,एवढेच काय तर पिलाला भरवत असलेल्या पक्षिणीला पाहून सुद्धा ती व्यथित होते. एक निर्जीव पाषाणही मूर्तीला जन्म देते तर कौसल्या का पाषाणाहून हीन आहे? ’मूर्त जन्मते पाषाणातुन ,कौसल्या काय हीन शिळेहुन’ . आकाशात हजारो तारका बघून ती म्हणते ‘गगन आम्हांहुन वृद्ध नाही कां, त्यात जन्मती किती तारका , अकारण... जीवन हे वाटले पाहुनी वेलीवरची फुले’  अलौकिक प्रतिभेचा धनी असलेला कवीच अशी सुंदर कल्पना करू शकतो !.
दशरथ आपल्या गुरुजनांची अनुज्ञा घेवून अपत्य प्राप्ती साठी पुत्रकामेष्टि यज्ञ करतात.यज्ञ सफल होतो. प्रत्यक्ष अग्निदेव त्यांना दिव्य कामधेनुनच्या दुधातील क्षीर देतात. त्या कृपाप्रसादाने राजांच्या घरी चार बालकांचा जन्म होतो. अयोध्या नगरीत आनंदी आनंद पसरतो. राम जन्माचे गीत अयोध्याजन गाऊ लागतात. चैत्र मास आहे, आम्रवृक्ष मोहरले आहेत, उष्ण पण सुगंधयुक्त वायु वाहत आहे, अशा वेळी भर दुपारी सूर्य आकाशात थबकला कारण...राम जन्मला आहे !!!  ‘चैत्र मास शुद्ध त्यात नवमी ही तिथी, गंध युक्त तरीही वात उष्ण हे किती ; दोन प्रहरी का ग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला’. अत्यानंदाने आम्रवृक्षावर कोकिला देखील मूक झाल्या आहेत ‘बावरल्या आम्रशिरी मूक कोकिला’ . सूर, ताल, राग रंग याने न्हालेली धरतीसुद्धा डोलू लागते कारण तिला धारण करणारा शेषनाग डोलत आहे. ‘ बुडुनी जाय नगर सर्व नृत्य गायनी ,सूर ताल राग यात मग्न मेदिनी, डोलतसे ती ही जरा शेष डोलला ; राम जन्मला ग सखे राम जन्मला’
श्रीराम, लक्ष्मण , भरत आणि शत्रुघ्न चारी भाऊ अयोध्येच्या राज प्रासादात खेळू लागतात , त्यांचा बाल लीलांमध्ये सगळा राज प्रासाद गुंग होतो. याचे सुरेख चित्रण  ‘सावळा ग रामचंद्र’ या गीतात आहे. या गाण्याची एक विशेषता म्हणजे हे ‘ओवी’ या छंदात लिहिलेले आहे. ओवी हा वात्सल्य रसाने परिपूर्ण  छंद आहे. निरागस बालकाकड़े बघून मातेला स्फुरते ती ओवी ! या गीतात माडगूळकर उपमा अलंकारांचा अप्रतिम उपयोग करतात’ . ‘सावळा ग रामचंद्र माझ्या मांडी वर न्हातो अष्टगंधाचा सुवास निळ्या कमळाला येतो’  सद्यःस्नात नील वर्ण  रामचंद्राच्या अंगाचा  अष्ट गंधाचा सुवास म्हणजे जसा नीलकमलाला येणारा अष्ट गंधाचा सुवास . सावळा राम तीन गौर वर्ण भावंडांमध्ये असा वाटतो जसा ‘हीरकांच्या मेळाव्यात नीलमणि उजळतो’. कुठे तर कौसल्या एका अपत्यासाठी आसुसलेली होती आणि आता तिचे भाग्य असे फळाला आले की ती चार चार पुत्रांची माता झाली. ती म्हणते ‘सांवळा ग रामचंद्र , त्याचे अनुज हे तीन ,माझ्या भाग्याचा श्लोकाचे चार अखंड चरण’ .
चारही  बंधू मोठे होतात . राज्यसभेत बसू लागतात . एके दिवशी ऋषि विश्वामित्र अयोध्येला येतात. वनात राक्षसांनी धुमाकूळ घातला होता.यज्ञयाग , तप करणे अशक्य झाले होते. विश्वामित्र , राम लक्ष्मणाना  राक्षसांचा संहार करण्या साठी घेवून जातात. त्राटिका ,मारीच,सुबाहु इत्यादि असुरांचा वध करून तापसजनांस अभय देतात.
विश्वामित्रांना मिथिलेहून राजा जनकांचे यज्ञाचे आमंत्रण येते.ऋषि विश्वामित्र श्रीराम लक्ष्मणानाही आपल्या बरोबर येण्याचे निवेदन करतात. मिथिलेला जात असताना वाटेत एक ओसाड आश्रम आणि शिलारूप स्त्री रामांना दिसते. ते विचारतात की हे ऋषि हा आश्रम असा ओसाड का आहे आणि ही शिलारूप स्त्री कोण आहे? विश्वामित्र त्यांना अहल्येची कथा वर्णन करतात आणि त्या शिलेला पदस्पर्श करण्याची आज्ञा देतात. श्रीरामांच्या पदस्पर्श होताच त्या निर्जीव शिलेत प्राणांचा संचार होतो, अहल्या पुनर्जीवित होते.वर्षानुवर्ष गोठलेले श्वास मुक्त होतात.रामांच्या चरणी मस्तक ठेवून ती सती म्हणते ‘मुक्त जाहले श्वास चुम्बिती पावन ही पाउले, आज मी शाप मुक्त झाले’. रामांची चरण रज म्हणजे जणूं  ‘चरण धूलिचे कुमकुम माझ्या भालासी लागले’. शापाचे हलाहल युगानुयुगे पीत असलेली अहल्या सांगते ‘ तुझ्या कृपेने आज हलाहल अमृतात नाहले’  
विश्वामित्र मुनीं बरोबर दोघे बंधू मिथिला नगरीत पोहोचतात. तिथे यज्ञ तर असतोच त्याच बरोबर मिथिलेच्या राजकुमारी सीतेचे स्वयंवरही असते. त्यात एक अत्यंत कठीण पण असतो आणि तो म्हणजे जनकांना प्रत्यक्ष भगवान शिवाने दिलेल्या महाप्रचंड धनुष्याला प्रत्यंचा लावण्याचा. जो वीर त्या चापाला प्रत्यंचा लावेल त्याचा बरोबर सीतेचा विवाह होईल. अनेक रथी महारथी वीर प्रयत्न करतात पण कुणालाच जमत नाही. महाराजा जनक आणि मिथिलाजन चिंतित होतात.शेवटी श्रीराम उठतात, धनुष्याला वंदन करून ते प्रत्यंचा लावण्याच प्रयत्न करतात , अचानक तडिताघाता सारखा आवाज होतो आणि ते प्रचंड धनुष्य मोडून पडते.जनक सीतेचे कन्यादान करतात. श्रीराम आणि जानकी चे लग्न होते. मिथिला नगरजन गाऊ लागतात ‘आकाशाशी जड़ले नाते धरणी मातेचे , स्वयंवर झाले सीतेचे’ . किती अपूर्व कल्पना आहे. भूमिकन्या सीता आणि श्रीविष्णु अवतार प्रभु राम यांचा विवाह म्हणजे आकाश आणि पृथ्वी यांचे जडलेले नातेच तर आहे. ‘प्रभु रामचंद्रांच्यारूपाने जणू सीतेचे भाग्यच सावळे रूप लेवून तिच्या समोर उभे आहे. ‘उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे’ . राम आणि सीतेचे मिलन म्हणजे तर माया अणि ब्रह्माचे मिलन ! ‘सभा मंडपी मीलन झाले माया ब्रह्माचे, स्वयंवर झाले सीतेचे’ !!!!
श्रीराम,लक्ष्मण,जानकी अयोध्येला परततात. अयोध्येच्या आनंदाला तर सीमाच राहात नाही. दशरथ श्रीरामांचा राज्याभिषेक करण्याचा निर्णय करतात. श्रीराम राजा होणार, सीता महाराणी होणार. पृथ्वीची कन्याच तिची स्वामिनी होईल असा दुर्लभ योग कुठे बघावयास मिळणार? ‘तुझ्याच अंकित होइल धरणी,कन्या होइल मातृस्वामिनी  
पण मनी इच्छिले ते साकार झाले असे आयुष्यात नेहमीच कुठे होते? रामावतार घेतलेले प्रत्यक्ष श्रीविष्णु ही याला अपवाद नाही. कैकयी दशरथ राजाला खूप पूर्वी दिलेल्या दोन वरांचे स्मरण करून देते . आणि दोन वर मागून घेते,  ते म्हणजे रामाला १४ वर्षांचा वनवास आणि भरताला राज्यपद !!! भरताच्या नकळत , तो मातुल गृही गेला असताना. श्रीराम वनवासाला निघतात. जानकी आणि लक्ष्मणही बरोबर जातात. पुत्र वियोगाने शोकाकुल दशरथ प्राण सोडतात. आजोळाहून परत आलेल्या भरतासाठी हा धक्का जबरदस्त असतो. तो राम-लक्ष्मण-सीतेला परत आणण्यासाठी वनात येवून भेटतो आणि अयोध्येस परतण्याचा आग्रह करतो. सर्वज्ञ श्रीराम त्याला सांगतात ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा , दोष ना कुणाचा’. गीत रामायण रूपी गीत मालेचे मेरुमणि समजले जाणारे हे गीत म्हणजे जीवनाचे सार आहे .श्रीराम म्हणतात ,’अतर्क्य ना झाले काही जरी अकस्मात ,खेळ चाललासी माझ्या पूर्वसंचिताचा’  जे काही झाले ते अचानक झाले असेल पण अतर्क्य नाही झाले .यात दोष कुणाचाच नसून माझ्या पूर्वसंचितांचा खेळ आहे. ‘अंत उन्नति चा पतनी होई या जगात ,सर्व संग्रहांचा वत्सा नाश हाच अंत ,वियोगार्थ मीलन होते नेम हा जगाचा ‘.... किती सुंदर पंक्ती आहेत, या जगात प्रत्येक वस्तुचा क्षय हा अटळ आहे, उन्नतीचा अंत नेहमी पतन हाच असतो !  ‘जरामरण यातुन सुटला कोण प्राणिजात , वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा’ ही ओळ खूप सखोल अर्थ सांगून जाते. आपल्याला वरपांगी जे जे वाढत असताना दिसते , खरे तर ते क्षयाकडे अग्रसर होत असते. आयुष्यातील क्षण भंगुरता सांगणारा एक संस्कृत श्लोक आहे ‘यथा काष्ठं च काष्ठं च सम्येताम महादधौ, समेत्याचे व्यापे यथाम तद्वत भूत संगमा’ . याचा अर्थ आहे ‘ समुद्रात दोन लाकडे वाहत असताना काही काळ जवळ येतात, समुद्राची एक लाट एका क्षणात त्याना विलग करते त्याच प्रमाणे आयुष्यात बंधु बान्धव इष्ट मित्रांचे मिलन क्षणिक असते.’ या श्लोकाचा किती सारगर्भित अनुवाद माडगुळकर करतात ‘दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोड़ी दोघां पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा  मेळ माणसाचा ;पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा , दोष ना कुणाचा ’.
श्रीराम भरताची समजूत घालून त्यांस अयोध्येचा राजा होण्याचा सल्ला देतात तेव्हां तो आदर्श भाऊ म्हणतो ‘वैनतेयाची भरारी काय मशका साधते , का गजाचा भार कोणी अश्वपृष्ठी लादते ,राज्य करणे राघवांचे अज्ञ भरता शक्य का ‘ गरुडाची भरारी एक यःकिश्चित चिलटाला कशी साधेल? पाठीवर हत्तीचा भार वाहणे एका घोडयाला शक्य आहे का ? त्याच प्रमाणे हे राघवा आपले राज्य चालवणे या लहान भरतास कसे शक्य आहे? तो निवेदन करतो की हे रामा , मला आपल्या पादुका हव्या आहेत. सिंहासनावर या पादुका ठेवून मी राज्य करीन .’नांदतो राज्यात तीर्थी कमलपत्रा सारखा’ ज्या प्रमाणे कमलपत्र जलात असून ही अलिप्त असते तशाच अलिप्त वृत्तीने मी आपले राज्य चालवीन !
सीताहरण झाल्या नंतर तिच्या शोधात वनात फिरत असलेले श्रीराम-लक्ष्मण शबरीच्या आश्रमात येवून पोहोचतात. त्यांचा या भेटीचे सुंदर वर्णन माडगुळकरांनी  ‘धन्य मी शबरी श्रीरामा, लागली श्री चरणे आश्रमा’ या गीतात केले आहे. गदिमांच्या प्रतिभेला या गीतात अक्षरशः बहर आला आहे.खरे म्हणाल तर हे पूर्ण गीतच प्रासादिक आहे पण काही ओळी तर अप्रतिम आहेत. अत्यानंदाने रोमांचित झालेली वृद्ध शबरी श्रीराम-लक्ष्मणाला बघून म्हणते ‘रोमांचाची फुले लहडली वठल्या देहद्रुमा, लागली श्री चरणे आश्रमा’.  अनादी अनंत श्रीविष्णुचे अवतार रामांना ती म्हणते ‘अनंत माझ्या समोर आले, लेवुनिया नीलिमा’ ... किती समर्पक पंक्ती आहेत. चराचर सृष्टीची क्षुधा शमविण्यास समर्थ असलेले श्रीराम जेव्हां प्रेमाने तिला काही खाण्यास मागतात तेव्हां ती   भावविभोर होउन म्हणते ‘ आज चकोरा घरी पातली भुकेजली पौर्णिमा, लागली श्री चरणे आश्रमा’.  वनवासिनी शबरीजवळ  श्रीराम-लक्ष्मणाला देण्यास कन्दमूल फळे या शिवाय काय असणार? ती दोघां समोर अत्यंत प्रेमाने बोरे समोर ठेवत म्हणते ‘ वनवेलीनी काय वाहणे याविन कल्पद्रुमा , लागली श्री चरणे आश्रमा’. कल्पवृक्षाला एका वनवेलीने याहून जास्त काय वाहावे ??? रामाला दिलेली बोरे शबरीने आधीच चाखून पाहिली आहेत आणि फक्त गोड तेवढी समोर ठेवली आहेत. लक्ष्मणाच्या हे लक्षात येते तेव्हां त्याच्या मनातील शंका ओळखून ती म्हणते ‘का सौमित्रे शंकित दृष्टी, अभिमंत्रित ही नव्हेत उष्टी , या वदनी तर नित्य नांदतो वेदांचा मधुरिमा’ दिवस रात्र भक्तीतच लीन असलेल्या शबरीने चाखून पहिलेली ही बोरे उष्टी नसून अभिमंत्रित आहेत !!!
सीतेला मुक्त करण्यासाठी श्रीराम-लक्ष्मण , सेनापति सुग्रीव आणि समस्त सेना लंका नगरीच्या बाहेर येवून ठाकली आहे. युद्ध सुरु करण्या आधी व्यूह रचना होत असताना सुग्रीवाची दृष्टी लंकापुराच्या गवाक्षात उभ्या असलेल्या रावणाकड़े जाते. सुग्रीव कुणाला काही न सांगता एक उड्डाण घेऊन त्याचा जवळ जातो आणि द्वंद्वयुद्धाचे आह्वान देतो.महाबलाढ्य रावण त्याला चांगलीच टक्कर देतो. आपली शक्ति कमी पडत आहे असे समजताच सुग्रीव चपळाईने निसटतो आणि पुन्हा परत येतो. अचानक झालेल्या या प्रसंगाने सगळे आश्चर्यचकित होतात. आपल्या सेनापतिने, कुणाला ही पूर्व कल्पना न देता केलेले हे धाडस श्रीरामाना आजिबात आवडत नाही. त्याला सौम्य परंतु कणखर शब्दात श्रीराम म्हणतात ‘सुग्रीवा हे साहस असले , भूपतीस तुज मुळी न शोभले’. या गाण्यात दोन अतिशय सुंदर ओळी आहेत. ‘काय सांगू तुज शत्रु दमना , नृप नोळखती रणी भावना, नंतर विक्रम प्रथम योजना, अविचारे जय कुणा लाभले’ . राजनीति असो ,युद्धाचे मैदान असो किंवा प्रबंधन , नेहमीच प्रथम योजना (planning) आणि नंतर विक्रम (implementation ) असाच क्रम असायला हवा. नाही तर पराजय निश्चित आहे !!!
राम रावणाचे तुमुळ युद्ध होते. तिन्ही लोक या भीषण युद्धाने कम्पित होतात. शेवटी श्रीराम एक अभेद्य बाण मारून रावणाचा वध करतात. सगळीकड़े आनंदीआनंद  होतो. स्वर्गलोकीचे गन्धर्व किन्नर श्री रामाचा जयजयकार करू लागतात. ते म्हणतात ‘हा उत्पत्ति स्थिति लय कारक, पद्मनाभ हा त्रिभुवन तारक ;शरण्य एकच खल संहारक , आसरा हाच ब्रह्मगोला भू वरी रावण वध झाला ’ !!!
सीता माता मुक्त होते. श्रीराम, लक्ष्मण,सीता माई आणि समस्त वानर सेना अयोध्येला परत येतात. भरत त्यांची चातका सारखी वाट पाहत असतो. श्रीरामांचा राज्याभिषेक होतो. समस्त भूवर राम राज्य नांदू लागते.राम राज्य आदर्श राज्याची अशी कल्पना आहे की जिथे काहीच उणे नाही. अशा राम राज्यात कलंक असेल तर तो फक्त चंद्रकलेवर किंवा कज्जलरेखित स्त्री नयनांमध्येच असेल. ‘राम राज्य या असता भूवर , कलंक केवल चंद्र कले वर; कज्जल रेखित स्त्री नयनांवर ,विचारातले सत्य आणतिल अयोध्येत आचार, त्रिवार जयजयकार रामा त्रिवार जयजयकार’
‘समयी वर्षतील मेघ धरेवर,सत्य शालिनी धरा निरंतर ;शांति शांति मुनि वांछिती ती घेवो आकार ; त्रिवार जयजयकार रामा त्रिवार जयजयकार’ या पंक्ति किती छान आहेत. सुख, समृद्धी, शांति, आरोग्य सर्व काही राम राज्यात साकार होईल!!!
या माझ्या मनाला स्पर्शून गेलेल्या काही सुंदर जागा ! मला खात्री आहे की या महासागरात केवळ इतकीच रत्ने नाहीत. प्रत्येकाला त्याच्या दृष्टी प्रमाणे अनेक रत्ने आढळतील. कारण गीत रामायण म्हणजे  ‘काव्य नव्हे हे अमृत संचय’ . या सागराचे मंथन करून निघालेल्या या अमृताची मी चाखलेली गोडी तुम्ही ही अनुभवावी आणि यात सखोल जाऊन आणखी नवनवीन रत्ने शोधावीत हीच इच्छा !!!

No comments:

Post a Comment